सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिलने ही कारवाई केली आहे. ॲड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे बार काउन्सिलला आढळून आले.
हेही वाचा - राजकीय पक्षांच्या ऱ्हदयात धडकी भरविणारे टी. एन. शेषन : निवडणुकीचा चेहरा बदलवणारे व्यक्तिमत्व
ॲड. मंचेकर यांनी महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिलकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर काउन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली. या कारवाईिवरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयातही दाद मागितली होती; मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान वकिलांचा गणवेश आणि बॅँड घालून आझाद मैदानावर जल्लोष केला होता, तसेच त्यानंतर झालेल्या बैठकीतही त्यांनी गणवेश घातला होता. त्यांच्या या वागण्यामुळे वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं वकील मंचरकर यांनी काउन्सिलच्या निदर्शनास आणून दिलं होतं. या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली. आता त्यांना दोन वर्षे वकिली करता येणार नाही.
हेही वाचा- रस्त्यावर पायी कोणत्या बाजुने चालावे? : येथे जाणून घेऊ
सदावर्ते हे कायम कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असतात. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. पाटील यांच्या बाजूने सदावर्ते न्यायालयात बाजू मांडत होते. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातही कर्मचाऱ्यांच्या बाजूने सदावर्ते उभे राहिले होते. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावरही त्यांनी जहरी टीका केली होती.
कोण आहेत गुणरत्न सदावर्ते?
वकील सदावर्ते हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यांचं शिक्षण औरंगाबाद आणि मुंबई येथे झालं. नांदेडला असताना त्यांनी विद्यार्थी संघटना स्थापन करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले होते. मुंबईला आल्यावर त्यांनी वकिली सुरू केली. त्यांनी भारतीय राज्य घटनेवर पीएच.डी. केलेली आहे. मॅटच्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले असून बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवरदेखील होते. ॲड. जयश्री पाटील या त्यांच्या पत्नी असून त्यांना झेन नावाची मुलगी आहे. तिला आगिमध्ये लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार मिळालेला आहे. विशेष म्हणजे यावेळी ती केवळ १० वर्षांची होती.
सदावर्ते यांची कारकीर्द
☛ सदावर्ते यांनी आतापर्यंत, अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणारी आबाळ,
☛ ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस,
☛ डॉक्टरांना काम बंद करू न देण्याचे प्रकरण,
☛ प्रशिक्षणानंतरही १५४ पोलीस कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षकपदी नियुक्ती न देण्याचे प्रकरण,
☛ मॅटच्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करणे,
☛ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची उच्च न्यायालयातील केस,
☛ सुप्रीम कोर्टात ५० लाख कर्मचाऱ्यांबाबतचे प्रकरण,
☛ हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल करणे,
☛ मराठा आरक्षणाविरोधात दाखल याचिका,
☛ एसटी कर्मचाऱ्यांचे प्रकरण आदी अनेक केसेस त्यांनी हाताळल्या आहेत.
हेही वाचा - विमा नाकारला, न्यायालयाचा कंपनीला दणका : सव्वा कोटी देण्याचे आदेश
वकील सदावर्तेंना मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे आतापर्यंत हजारो धमक्या मिळालेल्या आहेत. याप्रकरणी त्यांना साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही धमकी दिल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांच्यावर हल्लाही झाला आहे.


If you have any doubt, then contact me