माझा महाराष्ट्र :
सध्या महाराष्ट्राच्या सत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयात घमासान सुरू आहे. यादरम्यान एक शब्द आपल्या वारंवार कानावर पडत आहे, तो म्हणजे ‘व्हीप’. हा व्हीप म्हणजे नेमकं काय? आणि त्याचे प्रकार किती? त्याचे विधीमंडळाच्या कामकाजात किती महत्व आहे? त्याचे उल्लंघन केल्यावर आमदार, खासदारांवर काय कारवाई होऊ शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊ.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अधिपत्याखालील पाच सदस्य असलेल्या पीठासमोर राज्याची सत्ता आणि शिंदे गटाच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू आहे. या खटल्यादरम्यान वारंवार व्हीप या शब्दाचा उल्लेख केला जात आहे. शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाला, तेव्हा शिवसेना पक्षाच्या वतीने व्हीप बजावण्यात आला होता. तो श्ािंदे गटाने मान्य केला नाही आणि भाजपबरोबर जाऊन सत्ता स्थापन केली. मात्र शिंदे गटाने स्वतंत्र पक्षप्रतोदाची नियुक्ती करून स्वतंत्र व्हीप बजावला. यावेळी न्यायालयाने आमदारांवरील कारवाईला स्थगिती दिल्याने शिंदे गट सत्ता स्थापन करू शकला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजिनामा दिल्याने हा प्रश्न बाजुला राहिला आणि सत्ता स्थापन झाली.
आता न्यायालयीन कामकाज सुरू झाल्याने या मागील सर्व गोष्टींवर चर्चा सुरू आहे. त्यात व्हीपवरही युक्तीवाद होत आहे. ‘‘प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या त्या पक्षाच्या व्हीपला बांधील असतो. लोकप्रतिनिधी असेपर्यंत तुम्हाला व्हीपचे पालन करावेच लागते. जोपर्यंत लोकप्रतिनिधी दुसºया पक्षात विलीन होत नाही, तोपर्यंत त्याला व्हीप पाळावा लागतो.’’ असे निरीक्षण सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नोंदवले आहे. त्यामुळे व्हीपला मोठे महत्व आले आहे.
व्हीप म्हणजे काय?
कायदेमंडळातील (संसद व राज्यातील विधानसभा व विधानपरीषद) पक्षांच्या प्रतोदांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींना काढलेला लेखी आदेश म्हणजे व्हीप. व्हीप हा बिटिशांच्या काळातील शब्द आहे. या शब्दाचा शब्दश: अर्थ आहे, ‘चाबूक’, मात्र कायदेमंडळच्या भाषेत या शब्दाचा अर्थ आहे, ‘प्रतोद’. पक्षाच्या आदेशासंदर्भात हा शब्द वापरला जातो. व्हीप म्हणजेच ‘पक्षादेश’. यासाठी प्रत्येक पक्षाच्या वतीने एक प्रतोद नेमला जातो. आपल्या पक्षाच्या सर्व प्रतिनिधींवर नियंत्रण ठेवण्याचं काम या प्रतोदाकडे असतं. या प्रतोदाची निवड पक्षाचा विधीमंडळ नेता करतो आणि या विधीमंडळ नेत्याची निवड कायदेमंडळातील सदस्य करतात.
कायदेमंडळात एखाद्या विषयावर महत्वाची चर्चा असेल किंवा मतदान करायचे असेल, तर पक्षाकडून व्हीप जारी केला जातो. विधीमंडळात त्या त्या पक्षाचा पक्ष प्रतोद हा व्हीप जारी करतो.
व्हीपचे प्रकार कोणते?
व्हीपचे तीन प्रकार आहेत. वनलाईन व्हीपमध्ये विधीमंडळातील पक्षाच्या सदस्यांना मतदानासंदर्भात माहिती दिली जाते. यावेळी एखाद्या सदस्याला पक्षाच्या विचारानुसार मत द्यायचे नसेल, तर त्याला मतदानादरम्यान अनुपस्थित राहण्याची मुभा दिली जाते. टू लाईन व्हीपमध्ये पक्षाच्या सदस्यांना मतदान प्रक्रियेत कायदेमंडळात हजर राहणे बंधनकारक असते. थ्री लाईन व्हीपमध्ये एखाद्या महत्वाच्या विधेयकावर मत द्यायचे असेल किंवा महत्वाच्या विषयावर पक्षाची भूमिका ठरवायचे असेल, अर्थसंकल्प मांडताना किंवा अविश्वास ठरावादरम्यान हा व्हीप बजावला जातो. या व्हीपच्या बजावणीनंतर त्या पक्षाच्या आदेशाचे पालन करणे सर्व सदस्यांसाठी बंधनकारक असते.
व्हीपचे उल्लंघन झाल्यास काय कारवाई होते?
या व्हीपचे वेळोवेळी उल्लंघनही झाले आहे. मात्र असे झाल्यास कारवाईलाही सामोरे जावे लागते. थ्री लाईन व्हीपचे उल्लंघन केल्यास त्या सदस्याची केवळ पक्षातूनच हकालपट्टी केली जात नाही, तर त्याचे सदस्यत्वही धोक्यात येऊ शकते. कायदेमंडळाच्या त्या त्या सभागृहाच्या अध्यक्षांना पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत ही कारवाई करता येते. यालाही एक अपवाद आहे, दोन तृतियांश सदस्यांनी जर व्हीप मान्य केला नाही, आणि त्यांनी जर दुसºया पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला, तर मात्र त्यांचे सदस्यत्व शाबूत राहू शकते. दुसरा एक अपवाद आहे, तो म्हणजे राज्यात राष्टÑपदी राजवट लागू असेल, तर या व्हीपचा काहीही उपयोग नाही.
व्हीप न पाळण्यासाठी एक महत्वाचा अपवाद आहे, आणि तो म्हणजे दोन तृतीयांश सदस्य आपल्यासोबत असायला हवेत, तर या सदस्यांवर कारवाई होऊ शकत नाही, परंतु येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, या सर्व सदस्यांनी दुसऱ्या एखाद्या पक्षात प्रवेश करायला हवा. आणि हेच शिंदे गटाच्या बाबतीत झालेले नाही. शिंदे गटानं दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नाही.
शिंदे आणि ठाकरे गटाचे व्हीप
विधानसभेत सत्तास्थापनेसाठी झालेल्या मतदानासंदर्भात शिंदे आणि ठाकरे गटाकडून आपापल्या बाजुने दोन स्वतंत्र व्हीप बजावण्यात आले होते. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या व्हीपनुसार 15 आमदारांवर, तर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपनुसार 39 आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
What is vhip, let's know
If you have any doubt, then contact me