माझा महाराष्ट्र
अनेक वर्षे बंद राहिलेल्या बैलगाडा शर्यती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुरु झाल्या, यात अनेक लोक उत्साहात सहभागी झाले. मात्र या बैलगाडा शर्यतीत चक्क मॅच फिक्सिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील मदनवाडीत हा प्रकार घडला.
इंदापूर तालुक्यातील मदनवाडीत आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत स्थानिक बैलगाड्यांच्या चिठ्ठया काढून फायनलला ठेवण्याचा घाट आयोजकांनी घातला आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बकासूर बैलाच्या मालकांनी मॅच फिक्सिंगला वैतागून बैलगाडा माघारी नेला . यामुळे बैलगाडा मालक संघटनेने या प्रकाराचा निषेध नोंदवला असून या मैदानातील अनेक बैलगाडा माघारी गेल्याने मैदानात ‘ फायनल ’ घेण्यात आली नाही . यामुळे स्पर्धा पूर्ण झाली नाही .
राज्यभरात नावाजलेल्या बैलगाडा मालकांनी प्रवेश फी भरून सहभाग नोंदवला होता . यामध्ये प्रामुख्याने मुळशीचा बकासूर , शेवाळे यांचा बावऱ्या , तर कलेढोणकरांचा लक्ष्मणराव सारख्या नामांकित बैलगाडा मालकांनी हजारो रुपये खर्चून हजेरी लावली होती . मात्र , स्थानिक बैलगाडा सेमीफायनलमध्ये यावे , यासाठी चिठ्यांत केल्या गेलेल्या हातचलाखीमुळे नामांकित बैलगाडा मालकांनी स्पर्धेतून माघार घेतली .
शर्यतीदरम्यान प्रेक्षकांत बैलगाडा घुसून एक प्रेक्षक गंभीर जखमी झाला असून , त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे . तर , दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली . याप्रकरणी जबाबदार यंत्रणेविरोधात गुन्हा नोंदवला जाणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे . तर , बैलगाडा शर्यतीदरम्यान काही अपप्रकार घडून जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न समोर येत आहे .
मदनवाडी केसरी बैलगाडा स्पर्धा अत्यंत शिस्तीने आणि नियमाने सुरू होती . मात्र , ' तालुका कमिटी ' आणि ' जिल्हा कमिटी ' यांच्यात योग्य प्रकारे समन्वय नसल्यामुळे गैरसमज निर्माण झाला आणि आपलाच गाडा मध्यभागी धावेल , अशी अडेलपणाची भूमिका काही मालकांनी घेतल्यामुळे सदर प्रकार घडल्याचे आयोजकांनी सांगितले.
बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात नियोजनाचा अभाव असल्याने बैलगाडा मालक वैतागून निघून गेल्याचे पाहिल्याने जमलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली , यात प्रेक्षकांनी किरकोळ दगडफेक केली , तर आयोजकांसह देखील काही जणांचा वाद - विवाद झाल्याची चर्चा आहे .
If you have any doubt, then contact me