माझा महाराष्ट्र :
ही गोष्ट आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी गावातील. आई- वडिलांच्या अकाली निधनानंतर सिसोदे कुटुंबातील चार भावंडांनी अत्यंत खडतर परिस्थितीत आपले जीवन व्यतिथ केले. कृष्णा, ओंकार, आकार या सिसोदे बंधुंच्या आई-वडिलांचे ते खूप लहान असतानाच निधन झाले होते. नापिकीमुळे झालेल्या कर्जाला कंटाळून त्यांनी स्वत:ला संपवले होते. या भावंडांनी सुरुवातीला गावातीलच जिल्हा परीषदेच्या शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर खानापूर फाटा येथील आश्रमशाळेत सातवीपर्यंत ते शिकले. मात्र ही शाळा बंद झाली. यानंतर त्यांनी परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शैक्षणिक संस्थेत मोफत शिक्षणाची संधी मिळाली. तेथे त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर पुणे येथील महिला व बालकल्याण विभागाच्या वसतिगृहात काम करत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. त्यानंतर या तिघांनीही पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले. पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर तिन्ही भावंडांपैकी कृष्णा आणि आकार यांनी मुंबई तर ओंकार यांने परभणी जिल्ह्यासाठी अर्ज भरला. या भरतीत हे तिघेही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले आणि तिघांचीही एकाच वेळी पोलीस दलात निवड झाली. हे सर्व करत असताना या तिन्ही भावंडांना मोठ्या भावाने पाठबळ दिले.
तिन्ही भावंडांचे मोठे भाऊ आकाश सिसोदे आजही माखणी गावात सालगडी म्हणून काम करत आहेत. त्यांनी या तिघा भावंडांना शिक्षणासाठी मदत केली, तसेच त्यांची काळजी घेतली. त्यांना आई-वडिलांची माया दिली. त्यांच्या कष्टाचे फळ आज अखेर मिळाले आहे. या तिघा भावंडांचा प्रवास आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
If you have any doubt, then contact me