". 'समृद्धी'वर वेगाशी स्पर्धा घेतेय अनेकांचा जीव : बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघातात सहा ठार

'समृद्धी'वर वेगाशी स्पर्धा घेतेय अनेकांचा जीव : बुलढाणा जिल्ह्यात भीषण अपघातात सहा ठार

माझा महाराष्ट्र
0

माझा महाराष्ट्र :

समृद्धी महामार्गावरील वेगाशी केली जाणारी स्पर्धा अनेकांचे जीव जाण्यास कारणीभूत ठरत आहे. या महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावर जो वेग निश्चित केला गेला आहे, त्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे वेळोवेळी अधोरेखीत होत आहे.


छत्रपती संभाजीनगरचं एक कुटुंब शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी चाललं होतं; मात्र वाटेतच त्यांचा अपघात झाला. बुलढाणा जिल्ह्यात शिवनी पिसा गावाजवळ त्यांच्या मारुती अर्टिगा या कारचा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगर येथून बोरुडे आणि बर्वे हे दोन कुटुंब शेगाव येथे दर्शनाकरीता चालले होते. शिवणीपिसा गावाजवळ त्यांची कार उलटली. हा अपघात इतका भीषण होता, की यात कारचे छत उडून गेले व प्रवासी रस्त्यावर विखुरले गेले. यात सहा जणांचा मृत्यु झाला.


का होताहेत समृद्धीवर अपघात ?

समृद्धी महामार्ग किंवा हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर लांबीचा, आठ पदरी, १२० मीटर रुंदीचा महामार्ग आहे. या महामार्गावर छोट्या कारसाठी १२० किलोमीटर प्रतितास, मालवाहतूक वाहनांसाठी ८० किलोमीटर प्रतितास तर मोठ्या प्रवासी वाहनांसाठी १०० किलोमीटर प्रतितास असा वेग निश्चित केला आहे; मात्र बरेचसे कारमधून प्रवास करणारे लोक वेग मर्यादांचे पालन करीत नाहीत. कित्येक लोक वेगाशी स्पर्धा करत २०० किलोमीटर प्रतितास या वेगाने प्रवास करतात. तसे व्हीडीओ अनेकांनी समाजमाध्यमांवर टाकलेले आढळतात. त्यामुळे अनेकांचे कारवरील नियंत्रण सुटून तर कित्येकांच्या कारचे टायर फुटून अपघात झाले आहेत. 

महामार्ग जरी मोकळा असला, तरी सुरक्षेसाठी वेगाच्या मर्यादेचे पालन सर्वांनी केले पाहिजे. वेगमर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या नियमाचे कठोरपणे पालन करणे गरजेचे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)