". अभ्यासासाठी मुलांना मारताय?, तर मग हे वाचाच

अभ्यासासाठी मुलांना मारताय?, तर मग हे वाचाच

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र : अभ्यास करत नाहीत, मुले आमचे एकत नाहीत, हे पालकांचे नेहमीचेच प्रश्न. या प्रश्नांतून सुटण्यासाठी बहुतांशी पालक एकच मार्ग अवलंबतात, तो म्हणजे मुलांना मारणे; परंतु या पालकांना हे माहिती नाही, की जो प्रश्न सुटण्यासाठी त्यांनी मुलांना मारलंय, तो प्रश्न तर आता नक्कीच सुटणार नाही; परंतु त्याने इतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत.

मुलांना मारणे हा पालकांसाठी एक शॉर्टकट आहे; परंतु तो योग्य नाही. मुलं ऐकत नाही, मुलं अभ्यास करत नाहीत, हे प्रश्न नक्कीच आहेत, परंतु या प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. छडी आणि शिस्तीचं नातं जरी खूप जुनं असलं, तरी ही संकल्पना बदलणे काळाची गरज आहे. जगभरात झालेल्या संशोधनात हे लक्षात आलंय, की मुलांना शिस्त लावण्यासाठी जेव्हा धाकाचा उपयोग केला जातो, तेव्हा मुलं अधिकच हट्टी होतात.

मग काय करावं, की जेणेकरून मुलांना मारण्याची गरज पडणार नाही. तर ज्या सवयी मुलांना लावायच्या असतील, त्या पालकांनी आधी स्वत:ला लावाव्यात. उदा. मुलांना वाचण्याची आवड लावायची असल्यास, पालकांनी मुलांसमोर आवर्जुन पुस्तक वाचत बसावं. ज्या पालकांना मुलांनी मोबाईल पाहू नये, असं वाटत असेल, त्यांनी आधी स्वत: मोबाइलपासून दूर जायला हवं. अशा चांगल्या सवयी आधी पालकांनी स्वत:ला लावायला हव्यात. अशा पद्धतीने गेलं तर मुलांना शिकवणं अवघड नाही.

अभ्यासाबाबत संशोधन सांगतं, की रागात, दबावात, भितीच्या वातावरणात, धाकात मुलं नीट शिकत नाही. कारण त्यांचा मेंदू त्यांना शिकू देत नाही. मेंदूमध्ये एमिग्लाडा नावाचा भाग असतो. कोणत्याही भावना अनावर झाल्या की हा भाग जागृत होतो. त्यानंतर एकाग्रता राहात नाही आणि साहजिकच मुलं शिकू शकत नाही, त्यांच्या लक्षात राहात नाही. म्हणजे गणित शिकण्यासाठी पालक किंवा शिक्षकांनी त्यांना एखादी चापट मारली, तर पहिलं हे होईल, की ते मूल ते गणित कधीच शिकणार नाही.

मुलांना मारण्याने अनेक दूरगामी वाईट परिणाम होतात. कालांतराने मुलं अशा पालकांची कदर करत नाहीत. अशा पालकांच्या चांगल्या गोष्टीही मुलं ऐकत नाहीत. मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. मुलं स्वभावाने हिंसक बनतात. मुलं बंडखोर होतात. मुलं रागीट बनतात. काही मुलं घरातून पळून जातात. मोठे झाल्यावर दूर जाण्याची संधी मिळाल्यास पुन्हा परत येत नाहीत. अशी मुलं पालकांना आयुष्यभर दूषणं देत राहतात.

याउलट मुलांना हे करू नका, ते करू नका, असे वारंवार सांगू नका, त्यांना मुक्तपणे निसर्गाच्या सानिध्यात जगू द्या, मुक्तपणे खेळू द्या, मातीत किंवा चिखलात उड्या मारू द्या, त्यांचे कपडे, बुट खराब होतील, असा विचार करू नका. पक्षी, प्राणी यांच्या सानिध्यात जगू द्या. भरपूर मैदानी खेळ खेळू द्या, आणि सर्वात महात्वाचे म्हणजे त्यांना आनंदी वातावरण द्या. त्यांच्याबरोबर मित्रासारखं राहा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)