दोन दात सोन्याचे असल्याच्या माहितीवरून १५ वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील रफी किडवाई मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी ओळख लपवून राहात होता. पोलिसांनी विम्याच्या रकमेचे आमिष दाखवून त्याला मुंबईत बोलावले व अटक केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की तक्रारदार गंगर यांचा हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी प्रवीण जडेजा (वय ३८) हा त्यांच्याकडे १५ वर्षांपूर्वी कामाला होता. त्याला दुसऱ्या व्यापाऱ्याकडे पैसे आणण्यासाठी गंगर यांनी पाठविले होते. त्यावेळी त्याने मिळालेल्या ४० हजार रुपयांचा अपहार केला होता. त्याने पैशांची पिशवी चोरीला गेल्याचा बनाव केला होता. त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती. या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात येत नव्हता. त्यामुळे त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित करण्यात आले होते. गेल्या १५ वर्षांपासून तो फरार होता. परंतु त्याचे मूळ छायाचित्र वा कागदपत्रे पोलिसांकडे नव्हते. त्यामुळे त्याची माहिती मिळत नव्हती. अखेर त्याचे दोन दात सोन्याचे असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्याच्या आडनावावरून तो गुजरातमधील कच्छ या भागातील रहिवासी असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. त्यामुळे पोलिसांनी गुप्त खबऱ्यांना माहिती काढायला सांगितली. अखेर सोन्याचे दात, वयोगट आदी गोष्टींशी मिळतीजुळती व्यक्ती तेथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी विम्याचे पैसे घेण्यासाठी त्याला मुंबईला बोलावले. या अमिषाला तो बळी पडला व मुंबईला आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. तो नाव बदलून राहात होता.
If you have any doubt, then contact me