माझा महाराष्ट्र :
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असणाऱ्या फुले माळवाडी गावाच्या गावकऱ्यांनी आपलं गावच विकायला काढले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येत याबाबत ठराव केला आहे. राज्य किंवा केंद्र सरकारने गाव खरेदी करावे अशी मागणी त्यांची आहे. सरकारविरोधातील या अनोख्या आंदोलनाची आता राज्यभर चर्चा होत आहे.
गावातील जवळपास सर्वच शेतकरी कांदा उत्पादक आहेत. गावात शेतीवर आधारित असलेली कुटुंब आहेत.आरोग्य, शिक्षण, लग्न आणि दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणार पैसाही शेतकऱ्यांना शेती व्यवसायात उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे.
कांदा पिकाला भाव मिळावा आणि सरकारने अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी गळ्यात कांद्याची माळ घालून आंदोलनं झाली, निवेदने दिली, रास्तारोको केला, एवढंच काय तर कांद्याची होळीही केली. तरीही सरकार लक्ष देत नसल्याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील साडेतीन हजार लोकवस्तीचे माळवाडी गाव चक्क विकायला काढले आहे. गावातील शेतकरी व महिलांनी एकत्र येत संपूर्ण माळवाडी गाव विकणे आहे ' असा ठराव एकमताने केला आहे. सोमवारी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.
आत्महत्या करून कुटुंब वाऱ्यावर सोडण्यापेक्षा कसत असणाऱ्या शेतीसह गावच विक्रीला काढण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांपैकी कोणीही गाव विकत घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे.
दैनंदिन गरजा व खासगी सरकारी बँकांची कर्ज चुकती करण्यासाठी या गावच्या शेतकऱ्यांकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याने गाव विकण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला आहे. संपूर्ण गावकरीच गाव विकण्याच्या मनस्थितीत आले आहेत. शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अन्यथा आम्हाला गाव विकायचे आहे. ते सरकारनेच विकत घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेती विकायची आणि दुसरा रोजगार शोधायचा. मुलांनाही शेतीपासून दूर ठेवयाचे, अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.


If you have any doubt, then contact me